एसटी कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरूच; आझाद मैदानातून बाहेर काढताच आंदोलकांचा CSMT स्थानकात ठिय्या

मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली . यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या .

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात (Azad Maidan) बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार आम्ही इथेच बसून राहू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.