संभाजी भिडे यांना ते वक्तव्य भोवणार? राज्य महिला आयोगाने बजावलीय नोटीस

Pune – ‘तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो’, असे विधान करणे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना चांगलेच महागात पडले आहे. संभाजी भिडे आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी संभाजी भिडे यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानावरून वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी संभाजी भिडेंविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान आता संभाजी भिडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून महिला आयोगाने (State Commission For Women) त्यांना नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विटरद्वारे संभाजी भिडे यांना नोटीस बजावली आहे. महिला पत्रकाराने टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा तात्काळ खुलासा करावा, अशी नोटीस महिला आयोगाद्वारे देण्यात आली आहे.

तसेच ट्वीटमध्ये नोटीस जोडत रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांनी लिहिले आहे की, साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला तु टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणार्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी आज केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा. असं त्यांनी म्हटले आहे.