‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार !

पुणे दौऱ्यात आमदार महेश लांडगे यांच्या विनंतीला अनुमती

पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ पिंपरी-चिंचवडमध्ये साकारात आहे. या शंभूसृष्टीचे अनावरण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनुमती दिली आहे. तसेच, बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होण्याबाबत केलेल्या न्यायालयीन लढ्यात यशस्वी झाल्याबद्दल महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचेही अभिनंदन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी (सीएफएसएल) येथे पिंपरी-चिंचवड भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शहा यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी मोशी येथे साकारण्यात येत असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ ची प्रतिकृती यावेळी अमित शहा यांना भेट देण्यात आली. त्यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच, देशातील तमाम शिव-शंभू प्रेमींसाठी प्रेरणास्थान असलेल्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी आपण उपस्थित रहावे, अशी विनंती आमदार महेश लांडगे यांनी केली. यावर आपण आवर्जुन उपस्थित राहू, अशी अनुमती शहा यांनी दिली.

बैलगाडा शर्यतीच्या निकालाबाबत कौतूक…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांनी यशस्वी पाठपुरवा केला. राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात कायदा केला आणि त्यावेळी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे सर्वोच्च नयायालयात शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला, अशा शब्द्दांत अमित शहा यांनी आमदार लांडगे यांच्यासह अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि बैलगाडा शर्यतप्रेमींचे कौतूक केले आहे.