सोमय्या अडचणीचे ठरतात तेव्हा चहात पडलेल्या माशी सारखं काढून टाकलं जातं…

मुंबई : भाजपचे आत्ताच्या घडीला सर्वात चर्चेत असलेले नेते म्हणजे माजी खासदार किरीट सोमय्या. किरीट सोमय्या म्हणजे भ्रष्टाचाराविरोधात वापरण्याचं भाजप हत्यार आहे. मग युती सरकारच्या काळातील सुरेश जैन यांच्यावर केलेल्या आरोपांपासून आता हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांपर्यंत सोमय्या अगदी फ्रंटफुट वर खेळले आहेत. यात एक बाब आपल्याला नाकारून चालणार नाही ती म्हणजे सोमय्यांचे आरोप जर भाजपच्या हिताचे असतील तर संपूर्ण पक्ष त्यांच्या मागे ढाल बनून उभा राहतो अन् सोमय्या अडचणीचे ठरत असतील तर चहात पडलेल्या माशी सारखं त्यांना बाजूल काढून टाकलं जातं

आता हेच पहा ना आज किरीट सोमय्या भाजपच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. कारण त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात आरोपांची माळच लावलीय. सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कोल्हापूर निघाले तर मुलुंड पासून कराडपर्यंत भाजपचे कार्यकर्ते एखाद्या हिरो प्रमाणे त्यांना खांद्यावर घेऊन नाचत होते. ठाणे, लोणावळा, पुणे, कराड सर्वच स्थानकावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांना समर्थन देण्यासाठी गर्दी केली होती.

ही झाली एक बाजू पण सोमय्या जर अडचण ठरत असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले जाते ‘आता तुम्ही इथून निघून जा नाहीतर पक्षाला तोटा होईल’. होय हे खर आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजप-शिवसेनेत इतकं फाटलं होतं की युती होईल असं कोणाला वाटत नव्हतं. कारण किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बरेचशे प्रकरणं बाहेर काढले होते. त्यावेळी किरीट सोमय्या यांचे ‘मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे माफिया वांद्रयात राहतात’ या वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला होता. त्यामुळे युती होणार नाही हे जवळ-जवळ नक्कीच होत.

मात्र तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याचे ठरवले. सेना नेतृत्व देखील युतीसाठी तयार झालं पण अट होती किरीट सोमय्यांना बाजूला करा, ईशान्य मुंबईमधून त्यांना तिकीट दिले तर शिवसेना त्यांच्या विरोधात प्रचार करणार. भाजपच्या शिरस्त नेत्यांनी ही मान्य केली, आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काम करणारे खासदार अशी ख्याती असणाऱ्या सोमय्या यांच्या जागेवर मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली.

आता युतीची घोषणा होणे बाकी होते. मुंबईत एका प्रतिष्ठित हॉटेल मध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची संयुक्त पत्रकार परिषद होऊन युतीची औपचारिक घोषणा होणार होती. मुंबईतील भाजप आणि शिवसेनेचे सर्व प्रतिष्ठित नेते या ठिकाणी उपस्थित होते. साहजिकच किरीट सोमय्या हे देखील होतेच. उद्धव ठाकरे थोड्याच वेळात या ठिकाणी पोहचणार होते. इतक्यात भाजपच्या एका बड्या नेत्याचा किरीट भाईंना निरोप आला ‘तुम्ही आता इथून निघा नाहीतर परिस्थिती पुन्हा बिघडेल’. पक्षाचा आदेश माननारे किरीट सोमय्या एकही उलट प्रश्न न करता तिथून निघून गेले. अगदी जनसंघ, विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप असा एकनिष्ठ प्रवास असणाऱ्या किरीट सोमय्या यांची मनस्थित काय असेल याचा अंदाज न लावलेलाच बरा.