आपल्या फिरकीवर कांगारूंना नाचवणारा पुण्याचा विकी जग जिंकणार !

पुणे : नवी दिल्ली : सध्या वेस्ट इंडिज येथे अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताच्या युवा संघाने कमाल करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना बलाढ्य इंग्लड संघाशी होणार आहे. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्य फेरीत भारताच्या संघाने तब्बल 96 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २९० धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार यश धुलच्या धमाकेदार ११० आणि शेख राशीदच्या तांडेखेबंद ९४ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर २९१ धावांचे लक्ष ठेवले होते. यश धुल आणि शेख राशीद फलंदाजीसाठी मैदानावर उतरले, तेव्हा संघाच्या दोन बाद 37 धावा होत्या. त्यांनी त्या कठीण परिस्थितीतून डाव सावरला व एक मोठे लक्ष्य उभारले.

ऑस्ट्रेलियाकडून फक्त लाचलन शॉ ने (51) अर्धशतकी खेळी केली. त्या व्यतिरिक्त अन्य फलंदाज संघाला गरज असताना मोठी खेळी करु शकले नाही. लाचलन शॉ चा अडसर वेगवान डावखुरा गोलंदाज रवी कुमारने दूर केला. त्याने शॉ ला क्लीन बोल्ड केलं. पुणेकर विकी ओस्तवालच्या प्रभावी फिरकी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज निष्प्रभ ठरले. विकी ओस्तवालने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. रवी कुमार, निशांत सिंधूने प्रत्येकी दोन तर कौशल तांबे, अंगक्रिष रघुवंशीने एक विकेट घेतला.

…आणि विकी ओस्तवाल झाला पुणेकर

उपांत्य फेरीतील सामन्याचा हिरो ठरलेला विकी ओस्तवालचा प्रवास मोठा खडतर राहिला आहे. विकी 9 वर्षाचा होता त्यावेळी तो क्रिकेट खेळण्यासाठी लोणावळ्यातून मुंबईला क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. तो नेहमी उशीरा येतो आणि लवकर जातो, असे त्याचे कोच मोहन जाधव यांना लक्षात आले. त्यांनी कारण विचारल्यानंतर आपण रोज लोणावळ्याहून येत असल्याचं विकीनं सांगितलं. रोजच्या रेल्वे प्रवासातच विकीची दमणूक होत असे, तरीही त्याने क्रिकेट सुरू ठेवले. तो मैदानात नेहमी फ्रेश असे.

विकी मुंबईत क्रिकेट खेळत होता. त्यामुळे तो सर्वप्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (MCA) कार्ड बनवण्यासाठी गेला. पण, त्याला कार्ड मिळाले नाही. कारण, मुंबईमध्ये जन्म झालेले खेळाडूचं एमसीएच्या स्पर्धा खेळू शकतात. त्यानंतर विकीला पुण्यात नोंदणी करण्यासाठी फोन आला.

कोच जाधव यांनी त्यावेळी विकीच्या वडिलांना पुण्यात घर किरायाने घर घेऊन राहण्याचा सल्ला दिला. विकीचा प्रवासाचा मोठा खर्च त्यामुळे वाचणार होता. विकीच्या वडिलांनी हा सल्ला मानला. त्यामुळे लोणावळ्याचा विकी मुंबईकर न होता पुणेकर बनला. पुण्यात त्याच्या क्रिकेटला गती मिळाली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.