भाजप नेत्याची दोन मुले आणि पत्नीसह विष घेत आत्महत्या, ‘या’ कारणामुळे उचलले धक्कादायक पाऊल

इंदोर – मध्य प्रदेशातील विदिशा येथे भाजपचे नगरसेवक संजीव मिश्रा यांनी दोन मुले आणि पत्नीसह विष प्राशन करून आत्महत्या केली. मुलांचा जागीच मृत्यू झाला तर पती-पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाला अनुवांशिक आजार असून त्यावर कोणताही उपचार नसल्याच्या तणावामुळे संजीव मिश्रा यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.

आत्महत्येच्या काही वेळापूर्वी संजीव यांने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यात त्यांनी लिहिले होते की, ‘देव हा आजार, मस्कुलर डिस्ट्रॉफी डीएमडी, अगदी शत्रूच्या मुलांनाही होऊ नये’.

संजीव यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांना या आजाराची माहिती मिळाली. यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचा एक ओळखीचा व्यक्ती घरात गेला असता दरवाजा बाहेरून बंद होता. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत पाहिले असता चौघेही बेशुद्ध अवस्थेत पडले होते. तत्काळ चौघांनाही रुग्णालयात नेण्यात आले मात्र चौघांचाही मृत्यू झाला.

मस्कुलर डिस्ट्रॉफी हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची शक्ती कमकुवत होते. स्नायू कमकुवत झाल्यामुळे ते आकुंचित होऊ लागतात. हा अनुवंशिक आजार असून यावर कोणताही उपाय नाही.