फडणवीस-गडकरींची नाचक्की; नागपुरात भाजपच्या उमेदवाराला धूळ चारत सुधाकर अडबालेंचा विजय 

नागपूर – नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच हाती आलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. (Mahavikas Aghadi candidate Sudhakar Adbale has won in Nagpur teacher constituency election results.). त्यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला.  हा भाजपसाठी मोठा धक्का  मानला जात आहे.

सुधाकर अडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते असून मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. गणिताचे शिक्षक असलेले अडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत. गेले अनेक वर्ष ते या निवडणुकीची तयारी म्हणून शिक्षकांसाठी काम करत होते. जुनी पेन्शन साठी त्यांनी अनेक आंदोलन केली असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला मोठा मोर्चा काढून त्याचे नेतृत्व केले होते.

जरी महाविकास आघाडी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी खूप उशीर लावला असला, तरी अडबाले आधीपासूनच सर्व तयारी करून होते. परिस्थितीचा अंदाज घेऊनच काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने त्यांना अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, हा विजय भाजप, संघ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोठा धक्का मानला जात आहे.