‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम’ : आव्हाडांना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, हा दोष आपल्या…

मुंबई – खाते वाटपानंतर भाजपचे फायरब्रँड नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम (Vande Mataram) असं म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

यावर आता माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awad) सुधीर मुनगंटीवारांवर टीका केली आहे. तसेच आव्हाडांनी, बोलायला सुरुवात कशानं करावी हे तुम्ही शिकवणार का? असा खडा सवालच मुनगंटीवार यांना केला आहे. तसेच राज्यात आता सामान्यांवर बोलण्यावर अशी जोरजबरदस्ती करू नका असेही त्यांनी म्हटलं आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, तो श्वास कुठून कसा घ्यावा, हेही तुम्हीच ठरवणार का?”, अशी जोरजबरदस्ती करू नका, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत संताप व्यक्त करत म्हटले की, भारतीय संस्कारांत नमस्कार आहे, अनेक जण जय भीम म्हणतात. पोलीस अधिकारी जय हिंद म्हणतात, कोणी सतश्रीअकाल म्हणेल. भारतात स्वातंत्र्य आहे, लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या, आता तोसुद्धा तुम्हाला विचारुन घ्यायचा का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आव्हाडांनी घेतलेल्या या भूमिकेवर आता पुन्हा मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद साधू, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु. हा काही जातीय, धर्मांध शब्द नाही,” असंही त्यांनी सांगितलं. “मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात हे अभियान चालवायचं आहे. शिवसेनेचं किंवा इतर कोणत्या पक्षांचं काय म्हणणं आहे हे गौण आहे,” असं त्यांनी म्हटलं.

आव्हाडांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले “हे अभियान आहे. कोणत्याही व्यक्तीला कायदा करुन आम्ही जेलमध्ये टाकू असं सांगितलेलं नाही. हा आपल्या शिक्षणपद्धतीचा दोष आहे की, योग्य अर्थ काढण्याची क्षमता आपण विकसित करु शकलो नाही. हॅलो शब्दाला पर्यायी शब्द म्हणून वंदे मातरम वापरावं इतकंच म्हटलं आहे. यामध्ये श्वास आणि इतके मोठे शब्द वापरण्याची गरज नव्हती”.असं मुनगंटीवारांनी म्हटले आहे.