गेल्या 35 वर्षाच्या काळात एवढा सन्मान मिळाला नाही तो भाजपाच्या काळात मिळाला – सुजय विखे पाटील

नगर : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून काल मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. खाते वाटपानंतर यामध्ये बंडखोर गटाची अवस्था सांगता येत नाही अन् बोलताही येत नाही, अशीच झाली असली, तरी भाजपमध्ये दिग्गजांना महत्त्वाच्या खात्यांपासून वंचित ठेवल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत.

देशाचे गृहमंत्री अमित शहा ( Amit Shaha ) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्यावर विश्वास दाखवत महसूलसारखे वजनदार खाते त्यांना दिले आहे. या शिवाय त्यांच्याकडे पशूसंवर्धन व दुग्धविकास सारख्या खात्यांचाही कारभार असणार आहे. खरतर हे खाते माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळेल असं सांगितलं जात होतं मात्र पक्षाने विखे-पाटील यांच्या पारड्यात आपले वजन टाकले.

महसूल विभाग जाहीर होताच विखे पाटलांकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येईल, असे सांगितले जात आहे. ते नवीन मंत्रीमंडळातील अहमदनगर जिल्ह्याचे एकमेव मंत्री आहेत. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस विरुद्ध भाजपला ताकद देण्यासाठी विखे यांनाच पालकमंत्रीपद मिळावे अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.

दरम्यान, गेल्या 35 वर्षापासून राधाकृष्ण विखे-पाटील हे राजकीय क्षेत्रात आहेत. मात्र, पक्षातील अंतर्गत मतभेदानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला पण सरकार हे महाविकास आघाडीचे स्थापन झाले होते. अखेर शिंदे सरकारच्या काळात का होईना त्यांचे 35 वर्षातील योगदानाचे फलीत झाल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे.या खात्याचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल यावरच लक्ष असणार असेही विखे पाटील म्हणाले आहेत.

गेल्या 35 वर्षाच्या काळात एवढा सन्मान मिळाला नाही तो भाजपाच्या काळात मिळाल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. कार्यक्षमता ओळखून न्याय मिळालाच नाही. आता संधी मिळाली असून त्याचे सोने केले जाणार आहे. विकासकामावरुनच दोन महसुलमंत्र्यांमध्ये काय फरक असतो हे आम्ही दाखवून देऊ असे म्हणत त्यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. मंत्रिपद आणि खाते देऊन भाजपाने मान ही दिला आणि न्यायही मिळाला असल्याची भावना डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.TV9 ने याबाबत वृत्त दिले आहे.