सुनील शेट्टीने केली जावई केएल राहुलची पाठराखण; खराब फॉर्मवर म्हणाले, ‘तो नाही त्याची बॅटच बोलेल’

आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आतापर्यंत केएल राहुलची (KL Rahul) कामगिरी चांगली राहिली नाही. त्यामुळे क्रिकेटशौकिनांकडून केएल राहुलवर टीका होताना दिसत आहे. मात्र आता केएल राहुलचा सासरा आणि अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) त्याच्या समर्थनार्थ बोलताना दिसले आहेत. सुनील शेट्टी त्यांचा मुलगा अहान आणि जावई केएल राहुल यांच्यात आपण कोणताही फरक किंवा भेदभाव करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अलीकडे सुनील शेट्टीने आपल्या जावयाच्या क्रिकेट कारकिर्दीतील खराब कामगिरीची चर्चा केली (Sunil Shetty On KL Rahul) आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, ‘आम्ही अपयशावर चर्चा करत नाही. कारण केएल राहुल एक योद्धा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या वाईट प्रदर्शनावर चर्चा करण्याऐवजी आम्ही इतर गोष्टींबद्दल त्याच्याशी बोलतो आणि त्याचे अपयशापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो.’

सुनील शेट्टी पुढे म्हणाले की, ‘मी केएल राहुलला क्रिकेट कसे खेळायचे हे शिकवत नाही. तो देशासाठी खेळतो. जर तो गल्ली क्रिकेट किंवा कोणासाठी खेळत नसेल, तर त्याला असे खेळा किंवा तसे खेळा असे सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही.’

‘मला वाटते की एक तरुण मुलगा वाईट टप्प्यातून जात आहे आणि तो त्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची मेहनत आपण पाहतो आहे. त्यामुळे टीकाकारांशी तो नाही तर त्याची फक्त बॅटच बोलेल. हा काय कोणता सिनेमा वगैरे नाही, जिथे संपूर्ण टीमने भूमिका साकारावी.  हे क्रिकेट आहे, तिथे त्याला एकट्यालाच खेळावे लागते’, असेही शेवटी सुनील शेट्टी म्हणाले.