Karmala : सभासदच अशा दांडेबहाद्दरांना जागा दाखवतील; सूनील तळेकर यांचा सुभाष गुळवे यांच्यावर हल्लाबोल

करमाळा – सुभाष गुळवे (Subhash Gulve) यांची कुऱ्हाडीचा दांडा होऊ पहाण्याची भुमिका तालुक्यातील सहकाराचा काळ होऊ पहात असून सभासदच अशा दांडेबहाद्दरांना जागा दाखवतील असा मार्मिक हल्लाबोल पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर (Sunil Talekar) यांनी केला. आदिनाथ कारखान्याचा बारामती अॅग्रो बरोबर भाडेपट्टी करार झाला असतानाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आदिनाथ कारखान्यास ओटीएस खात्यासाठी पत्र देणे चूक असून या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे सुभाष गुळवे यांनी जाहीर केले. गुळवेंच्या या कृतीचा आज पाटील गटाकडून खरपुस समाचार तळेकर यांनी घेतला आहे.

याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की एकेकाळी सहकारी तत्त्वावर चालणार्‍या आदिनाथ कारखान्याचा (Adinath Factory) कारभार सूभाष गुळवे यांनी सुद्धा पाहीला आहे. परंतू आता केवळ बारामती अॅग्रोने (Baramati Agro) कोणतीही निवडणूक न लढवता सुभाष गुळवे यांना थेट पद दिले असून या पदावर राहून बारामतीकरांवरील निष्ठा दाखवण्याचा गुळवे यांचा हा प्रयत्न आहे. सन 1947 पुर्वीसुद्धा अशा मानसिकतेची अनेक माणसे होती पण तरीही स्वातंत्र्य लढ्यास शेवटी यश मिळाले हा इतिहास आहे. आज सुभाष गुळवे हे सभासदांच्या नुकसाची चिंता करत असून करार होऊनही तीन वर्षे आदिनाथ बंद अवस्थेत होता त्यामुळे सभासद व कामगारांचे झालेले नुकसान सुभाष गुळवे यांना दिसले नाही का? पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर शेकडो कोटीहून अधिक कोटी स्थावर मालमत्ता असलेल्या आदिनाथचा भाडेपट्टी करार करुन घेताना सभासदांवर सत्तेच्या जोरावर केला गेलेला अन्याय गुळवे यांना दिसला नाही का? आजपावेतो सहकारक्षेत्रात जास्तीत जास्त पंधरावर्षे कारखाना भाडेपट्टी करारावर देण्याची नियमित पद्धत बाजूला सारून थेट पंचवीस वर्षाचा भाडेपट्टी करार करुन घेताना सुभाष गुळवे यांना आपण सभासदांचा मालकी हक्क जादा काळासाठी हिरावून घेत असल्याची खंत अथवा शरम वाटली नाही का? महाराष्ट्रात आदिनाथहून अधिक बिकट अवस्थेत असलेले इतर कारखाने असताना सुभाष गुळवे व कंपनीचा डोळा आदिनाथवरच का? या प्रश्नांची उत्तरे देण्याची नैतिकता सुभाष गुळवे यांनी द्यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

साखर विक्री करुन आदिनाथने स्वाभीमानाने बँकेचे कर्ज फेडले यामुळेच सुभाष गुळवे यांची पोटदुखी जास्तच वाढली असून आदिनाथ हा सुरुवातीस भाडेपट्टी करार करुन व भविष्यात थेट लिलाव करुन विकत घ्यायचा डाव फसल्यानेच आता सुभाष गुळवे हे न्यायालयात जाणार आहेत. जेणेकरून आता सहकार तत्वावर आदिनाथ चालू होण्यास आडकाठी आणायची व सभासदांचे आणखी नुकसान करायचे या मानसिकतेतूनच हा सगळा प्रकार गळवे व बारामती अॅग्रोकडून घडत आहे. आम्ही आदिनाथचे तीन कोटी भाडे दिले असल्याने आता हा कारखाना आम्हालाच चालवायला द्या अशी दादागीरी सभासद खपवून घेणार नाहीत. कारण आदिनाथ कारखाना हा बारामती अॅग्रोस चालविण्यासाठी द्यावा हा ठराव जसा आदिनाथच्या सर्व साधारण सभेत पुर्वी संमत झाला होता आता त्याच सभासदांनी आदिनाथ बारामती अॅग्रोस भाडेपट्टीवर देऊ नये असा नवीन ठराव सर्व साधारण सभेत केला आहे. सभासदांच्या या भावनेंची पायमल्ली सुभाष गुळवे व कंपनींनी करु नये. कर्मयोगी गोविंद (बापू) पाटील यांच्या त्यागातून हा कारखाना उभारला असून सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, स्व. रावसाहेब पाटील, स्व. गिरधरदास देवी, स्व. विनायक घाडगे, दिनकर लोंढे, पन्नाकाका लूणावत, गुरुदास जाधव आदिंच्या प्रयत्नांचा अपमान सुभाष गुळवे यांनी करु नये.असं देखील ते म्हणाले.

आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत (Tanajirao Sawant) यांनी यांनी माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांच्या मागणीनुसार आदिनाथला सर्वोतोपरी मदत करण्याचे काम केल्यानेच बँक व न्यायालय या दोन्ही ठिकाणी आदिनाथची कायदेशीर बाजू भक्कम झाली आहे. यासह मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis) यांनी सुद्धा आदिनाथ कारखान्याच्या सर्व अडचणी जाणून घेऊन मदतीचे आश्‍वासन दिले आहे. यामुळे आता गुळवे यांनी कितीही कायदेशीर आडकाठी आणायची ठरवली तरी काही उपयोग होणार नाही.माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ कारखाना सहकारी तत्त्वावरच चालणार असून या कारखान्यास गतवैभव मिळवून देण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील सक्षम आहेत असा ठाम विश्वास प्रवक्ते सूनील तळेकर यांनी व्यक्त केला.