Sunil Tatkare | यशाने हुरळून न जाता जमिनीवर पाय ठेवून लोकांसाठी काम करुया

Sunil Tatkare | यशाने हुरळून न जाता जमिनीवर पाय ठेवून लोकांसाठी काम करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माणगाव येथील आभार सभेत केले.

रायगड लोकसभा मतदारसंघात सगळ्यांनी परिश्रम घेतले त्यातून हे यश मिळाले असून त्यातून रायगड लोकसभा मतदारसंघात विकासाचा भरभक्कम पाया रचण्याचा मानस सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

चंद्र – सुर्य असेपर्यंत संविधान बदलले जाणार नाही हे टाहो फोडून आम्ही सांगितले मात्र जी काही नकारात्मकता लोकांच्या मनात रूजवण्यात विरोधक यशस्वी झाले आम्ही कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे काही घटकांनी महायुतीकडे पाठ फिरवली अशी कबुली सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली .

समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणारी लोकसभेची ही पहिलीच निवडणूक झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांचा आदर्श घेत महायुती सरकार राज्यात काम करत आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

अनंत गीते यांनी विशिष्ट समाजावर टिका केली होती हे पुराव्यानिशी सांगितले असताना तरीसुद्धा ते लोकांना पटले नाही याचेच आश्चर्य वाटल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हा राष्ट्रवादीचा खासदार नाही तर तो महायुतीचा खासदार म्हणून काम करेल असे सांगतानाच सहानुभूती ही एकदाच येते ती पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळे आता आपण केलेल्या विकासकामांच्या आधारावर आपल्याला लोकांसमोर जायचे आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

मला कमी मताधिक्य मिळाले असले तरी मी भरत गोगावले यांना ३५ हजाराचे मताधिक्य देणार असा शब्द सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

कोकणाचा हा बालेकिल्ला शाबूत राखण्यात आपल्याला यश आले आहे. मतांची टक्केवारी का कमी झाली याचा अभ्यास नक्कीच करु आणि ज्यांनी सहकार्य केले नाही अशा सगळ्यांना सोबत घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत सहा आमदार निवडून आणण्याचे सुतोवाच सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.

राजकारणात चढउतार होऊ शकतात परंतु समाजावर कधीच राजकारण चालत नाही. रायगड लोकसभा मतदारसंघात सुनिल तटकरे यांच्या रुपाने सगळ्या समाजाने त्यांना स्वीकारले हे दाखवून दिले अशा शब्दात आमदार भरत गोगावले यांनी जनतेबद्दल आभार व्यक्त केले.

सर्वसामान्यांना काही कमी पडू देत नाही. सगळ्या गोष्टींना सामोरे जातो मग जे सामोरे जात नाही त्यांना लीड का मिळत आहे याचे आता संशोधन करण्याची गरज आहे असेही भरत गोगावले म्हणाले.

ज्या घडामोडी झाल्या त्या पुन्हा विसरून कामाला लागा आम्हीही कामाला लागलो आहे. मी कधी समाजासमाजात दुजाभाव केला नाही आणि कधी करणार नाही असा शब्द भरत गोगावले यांनी दिला.

या आभार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माणगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर,भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश झोरे, राजू साबळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like