Sunil Tatkare | हिम्मत हारलेले आपण कार्यकर्ते नाहीत, पुन्हा एकदा जोमाने आपली ताकद दाखवून देऊ

Sunil Tatkare | धार्मिक ध्रुवीकरण करत यावेळी निवडणूका लढल्या गेल्या आणि त्याचा अनुभव देशाने घेतला. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळेच ८२ हजाराचे मताधिक्य मिळाले हे माझ्या कामाचे फलित आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दापोली येथील आभार सभेत कृतज्ञता व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले असले तरी काही मतदारसंघात आघाडी कमी मिळाली आहे मात्र याची जी कारणे आहेत त्याचा विचार करुन पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकीत उतरायचे आहे असे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केले.

आपले उद्दिष्ट फक्त विधानसभा निवडणूक असता कामा नये तर आपल्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पदावर बसवत नाही तोपर्यंत काम थांबवायचे नाही असेही सूतोवाच सुनिल तटकरे यांनी केले.

सर्वंकष नेत्यांचे पाठबळ या रायगड लोकसभा मतदारसंघात मला जसे लाभले तसे सर्वाधिक ज्या महिला मतदारांनी माझ्या विजयात तितकाच मोलाचा वाटा उचलला आहे त्यामुळेच घासून नाही तर ठासून निवडून आलो असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

कमी मताधिक्य जरी मिळाले असले तरी या मतदारसंघात काकणभर सरस काम केले जाईल असा शब्द सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

जे समाजघटक या लोकसभा निवडणुकीत आपल्यापासून दूर गेले आहेत त्यांना आपल्याकडे नक्कीच आणण्याचा प्रयत्न करु आणि येणाऱ्या आव्हानाला ताकदीने सामोरे जाऊ असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

मी या मतदारसंघात जो शब्द दिला आहे तो शब्द नक्की पाळणार आहे. एकवेळ श्रीवर्धन मागे राहिल परंतु दापोलीला झुकते माप दिले जाईल. सर्व प्रश्न सोडवले जातील. मी महायुतीचा खासदार तुमच्या हक्काचा आहे असेही सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.

हिम्मत हारलेले आपण कार्यकर्ते नाहीत. पुन्हा एकदा जोमाने या मतदारसंघात आपली ताकद दाखवून देऊ. समाजातील जे काही घटक दुरावले आहेत. ते परत कसे जोडले जातील. त्या घटकांनी लोकसभा निवडणुकीत झाले गेले विसरुन आम्ही जी सामाजिक समानता ठेवून काम करत आलो आहोत तीच समानता ठेवून काम करण्यासाठी त्यांचा हातभार घेऊ असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट शब्दात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like