‘आरआरआर’ फेम राम चरण बनणार ‘बाप’माणूस, पत्नीने दिली आनंदाची बातमी

हैदराबाद| दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरण हा त्याच्या ‘RRR’ सिनेमातून बॉलीवूडमध्येही प्रसिद्ध झाला आहे. याच राम चरणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी आणि उद्योजक उपासना कोनिडे हे लवकरच आई-वडील बनणार आहेत. राम चरणचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांनी स्वत: ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केली.

अभिनेता चिरंजीवी यांनी शेअर केली आनंदाची बातमी
“हनुमानजींच्या आशीर्वादाने… उपासना आणि राम लवकरच आई-वडील होणार आहेत, ही बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे,” असे चिरंजीवी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. राम चरण आणि उपासन यांनीही चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे,

लग्नानंतर १० वर्षांनी पहिले मूल
रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी एकमेकांना दोन वर्षे डेट केले होते. दोघेही कॉलेजपासून एकमेकांचे मित्र होते. २०१२ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या १० वर्षानंतर दोघेही पहिल्यांदाच आई-वडील बनणार आहेत. मगधीरा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. उपासना अपोलो लाईफच्या चेअरपर्सन आहेत आणि बी-पॉझिटिव्ह मॅगझिनच्या मुख्य संपादक देखील आहेत.