अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची मोठी कारवाई, तपासासाठी समिती स्थापन

Adani-Hindenburg : हिंडेनबर्ग अहवालाच्या आधारे, भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी 6 सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच सेबीलाही अनियमिततेचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.(The Supreme Court has ordered the formation of a 6-member expert committee to investigate the Adani-Hindenburg case)

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये अदानी प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. यासोबतच अदानीचा शेअर घसरल्याने आणि गुंतवणूकदारांचे झालेले नुकसान याप्रकरणी हिंडेनबर्गच्या मालकाची चौकशी करण्यात यावी, असे या याचिकांमध्ये म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याची बाबही या याचिकांमध्ये मांडण्यात आली होती. याआधी, सुनावणीनंतर न्यायालयाने आर्थिक क्षेत्रातील अनियमितता रोखण्यासाठी सरकारकडून उत्तरे मागितली होती. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.