भाकरी फिरवत शरद पवारांनी जबाबदारी सोपवताच सुप्रिया सुळे म्हणाल्या,…

Mumbai – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमावेळी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केली आहे. तसेच राष्ट्रवादीतील इतर नेत्यांवरही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मात्र अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही.

दरम्यान, या निवडीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.