बिचाऱ्या पंतप्रधान मोदींची काळजी वाटते, सगळीकडे त्यांनाच फिरावं लागतं; सुप्रिया सुळे यांची टीका

नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय नाही - सुप्रिया सुळे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच  मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. या भव्यदिव्य अशा कार्यक्रमामुळे विरोधक चांगलेच हताश झाल्याचे दिसून येत आहे. मोदींच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील त्यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

बिचाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांची काळजी वाटते की, सरपंचपदाच्या निवडणुकीपासून देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खूप कष्ट घेतात. तसेच प्रत्येक निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय नाही, असं म्हणत  सुप्रिया सुळे यांनी (Supriya sule) भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे आम्ही स्वागतच करतो. भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरूण जेटली, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहेत. मात्र आज यांच्यासारखे नेते भाजपमध्ये नाहीत. याचे वाईट वाटते, असंही त्या म्हणाल्या. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.