भारतावर ४ वर्षांनंतर मायभूमीत पराभवाची नामुष्की, ‘हा’ खेळाडू ठरला सर्वात मोठा खलनायक!

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा व शेवटचा वनडे सामना २१ धावांनी गमावला. या सामन्यासह भारतीय संघाने ३ सामन्यांची वनडे मालिकाही (ODI Series) २-१ च्या फरकाने गमावली. या मालिका पराभवासह भारतीय संघ चार वर्षांनंतर मायभूमीत वनडे मालिकेत पराभूत झाला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघानेच भारताला भारतात वनडे मालिकेत ३-२ च्या अंतराने पराभूत केले होते. त्यानंतर भारतीय संघाने सलग ७ वनडे मालिका जिंकल्या आणि आता अखेर त्यांच्या विजयरथावर ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) अंकुश लावला आहे.

भारताच्या मालिका पराभवाला अनेक खेळाडू कारणीभूत असले तरी एक खेळाडू असा होता, ज्याने तिन्ही सामन्यांमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नाही.

भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण असलेला खेळाडू दुसरा कोणी नसून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात सूर्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्याने दोन्ही वेळा आपली विकेट मिचेल स्टार्कला दिली. त्याचवेळी, तिसर्‍या वनडेत त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, परंतु तेथेही हा खेळाडू ऍस्टन अगरच्या पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

या मालिकेत सूर्याला स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी होती. मात्र त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे सूर्याला संघात संधी देण्यात आली होती. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात पाठवले. पण इथेही सूर्याला काही करता आले नाही.