एकच वादा, सूर्या दादा..! सूर्यकुमार यादवने ‘३६० डिग्री’ फटकेबाजी करत ठोकले टी२०तील तिसरे शतक

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvsSL) संघातील सन्मानाचा आणि निर्णायक सामना राजकोटच्या  (Rajkot) मैदानावर शनिवारी पार पडला. हा सामना जिंकत २-० च्या फरकाने मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील दिसले. त्यातही प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने ‘३६० डिग्री’ फटकेबाजी केली. त्याने मैदानाच्या चहूबाजूंना चेंडू मारत शानदार शतक झळकावले. हे सूर्यकुमारचे टी२० क्रिकेटमधील तिसरे शतक (Suryakumar Yadav Century) होते.

केवळ ४५ चेंडूत ८ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने शतक ठोकत सूर्यकुमार टी२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. त्याच्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने २०१७ मध्ये इंदोर येथे श्रीलंकेविरुद्धच सर्वात वेगवान शतक केले होते. त्याने ३५ चेंडूत हे शतक मारले होते. याशिवाय सूर्यकुमार टी२० क्रिकेटमध्ये ३ शतके करणाराही केवळ दुसरा भारतीय ठरला आहे.