एकच वादा सूर्या दादा! न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादवचे झंझावाती टी२० शतक

INDvsNZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बे ओव्हल येथे झालेला दुसरा टी२० सामना भारताचा मिस्टर ३६० डिग्री सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने गाजवला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजीची कोंडी झाली असताना सूर्यकुमारने आक्रमक शतकी खेळी केली. त्याच्या विस्फोटक शतकामुळे भारतीय संघ यजमान न्यूझीलंडला १९२ धावांचे मोठे आव्हान देऊ शकला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत सूर्यकुमारने सावध सुरुवात केली. मात्र अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पिटाऱ्यातील एकाहून एक भारी शॉट बाहेर काढले आणि केवळ ४९ चेंडूत शतक पूर्ण केले. डावाखेर ५१ चेंडूंचा सामना करताना ७ षटकार आणि ११ चौकारांसह १११ धावांवर तो नाबाद राहिला. हे त्याच्या टी२० कारकिर्दीतील केवळ दुसरे शतक (Suryakumar Yadav Century) आहे.

याखेरीज ७ षटकार ठोकत सूर्यकुमार चालू वर्षात (२०२२) ५० पेक्षा जास्त षटकार ठोकणारा पहिला आणि एकमेव फलंदाज बनला आहे. त्याने ६० षटकार पूर्ण केले आहेत. तयाच्यापाठोपाठ मोहम्मद वसीम (४३ षटकार) आणि रोवमन पॉवेल (३९ षटकार) यांचा क्रमांक लागतो.

सूर्यकुमारला वगळता केवळ सलामीवीर इशान किशनने चांगली खेळी केली. त्याने ३६ धावा फटकावल्या. इतर फलंदाजांना २० धावाही करता आल्या नाहीत. भारतीय संघाने २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १९१ धावा केल्या.