जनाधार नसताना मुख्यमंत्री, केंद्रात मंत्रिपद; सुशीलकुमारांचा पृथ्वीराज चव्हाणांवर अप्रत्यक्ष निशाणा

 मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पक्षाच्या प्रस्तावित आणि बहुचर्चित अशा ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये आपण जाणार नसल्याचे म्हटले आहे.  आता ही यात्रा कॉँग्रेसची तरी कुठे राहिली. योगेंद्र यादव सांगत फिरतात मी भारत जोडो यात्रा काढतो आहे अन् कॉँग्रेस माझ्यासोबत आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

चव्हाण म्हणाले की, माझ्याविरोधात प्रतिक्रिया याव्यात यासाठी पक्षाच्या मुख्यालयात बसलेले काही नेते कामाला लागले आहेत. या सगळ्या नेत्यांवर मोदींची छाप आहे, पक्षाची घसरण व्हायला तेच कारणीभूत आहेत. माझी भूमिका स्पष्ट आणि पक्ष हिताची आहे. पक्षात घटनेप्रमाणेच कार्यकारिणीच्या निवडणुका झाल्यात असे म्हणणाऱ्या नेत्यांसोबत मी टीव्हीवर खुली चर्चा करायला तयार आहे. गुलाम नबी आझाद हे पक्ष सोडून बाहेर पडले असले तरी ते देशव्यापी राजकारण करणार नाहीत. त्यांचा पक्ष केवळ जम्मू काश्मीरपुरताच मर्यादित असेल. असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसने मला खूप काही दिले. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. जनाधार नसलेल्या नेत्यांनाही मुख्यमंत्रिपद, केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले. तेच आता पक्ष नेतृत्वाला ‘तुम्ही देणारे कोण?’ असा प्रश्न विचारत आहेत, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी पक्षातील नेत्यांवर टीका केली. सुशीलकुमार यांनी  पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याचीही चर्चा आहे.

सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले?

ज्यांच्या मागे कधी जनाधार नव्हता, अशा नेत्यांना मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांनीच काँग्रेस श्रेष्ठींना शहाणपण शिकवावं, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे’ असं सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता म्हणाले. गेल्या २४ वर्षांत पक्षाच्या निवडणुका झाल्या नसल्याचे आरोपही त्यांनी फेटाळले. ‘पक्षाच्या घटनेच्या प्रक्रियेतूनच नवीन कार्यकारिणी होत गेल्यात. पक्षात लोकशाही नाही असे म्हणणारे आतापर्यंत का गप्प होते?असा उलट प्रश्नच शिंदेंनी उपस्थित केला. सकाळ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.