“झुकेगा नही घुसेगा! डायलॉग भारी, पण २०१६ पासून एक बाई तुमच्या घरात..” सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला

Thane – ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यानंतर ठाण्यात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी “उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं”, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ते काल नागपुरात सावरकर गौरव यात्रेत बोलत होते. “आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री. उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं, झुकेगा नहीं साला घुसेंगा. अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, आता या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. झुकेगा नहीं घुसेगा साला हा डायलॉग भारीच होता. पण २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला सात वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काही पटत नाही राव” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.