हे लोक सत्तातूर, फितूर अन् बदमाश; शिंदे गटावर सुषमा अंधारे यांचा प्रहार 

मुंबई : महाराष्ट्रमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राजकारणात उलथापालथ झाली आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला धनुष्यबाण आणि शिवसेनेचे नाव दिले आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, हा निर्णय आल्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केला आहे. कुठे फटाके वाजले तर कुठे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. शिंदे गटाच्या जल्लोषावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खोचक टीका केली आहे. पुण्यात माध्यामांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

कालचं शिंदे गटाचा जल्लोष म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटणारी माणसं असतात, त्याप्रकारचं तो जल्लोष होता. कारण भक्तगणांना हे कळत नाही की भाजपाने शिवसेनेचं किती नुकसान केलंच आहे. त्यापेक्षाही एकनाथ शिंदेंची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काल शेवटचा घाव घातला आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

प्रतिकांचं राजकारण महत्त्वाचं असलं, तरी प्रतिकांच्या राजकारणावर मुल्याधिष्ठीत राजकारण असतं, जे प्रत्येक शिवसैनिकांच्या ठायी आहे. या शिवसैनिकांची भावनिक नाळ ही मातोश्री, सेनाभवन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावांशी जोडली गेली आहे. जर एकनाथ शिंदे म्हणत असतील, की ते बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहेत, तर बाळासाहेबांचा शेवटचा शब्द होता, की माझ्यानंतर उद्धव आणि आदित्यला सांभाळा, याचाच अर्थ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नेतृत्व म्हणून स्वत: बाळासाहेबांनी निवड केली होती. बाळासाहेबांचा हाच शब्द जर हे लोक पाळू शकत नसतील, तर हे लोक किती सत्तातूर, फितूर आणि बदमाश असतील, हे कळतं”, असेही त्या म्हणाल्या.