शिवसेना प्रवेश करताच सुषमा अंधारे यांना गिफ्ट, उद्धव ठाकरेंनी सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

Mumbai – एकीकडे आमदार-खासदारांच्या बंडामुळे डॅमेज कंट्रोल भूमिकेत गेलेल्या शिवसेनेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे सुषमा अंधारे या भीमा कोरेगाव प्रकरणातील तक्रारदारही आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे (Uddhav Thackeray and Rashmi Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झालं.

उद्धव ठाकरेंनी देखील सुषमा अंधारे यांना शिवसेना प्रवेशाचं गिफ्ट दिलं. पक्षात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली. यावेळी आगामी काळात ग्रामीण भागांतून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्याकडून व्यक्त केली.