‘आमचे देवही दारू पितात’ म्हणणाऱ्या केतकी चितळेवरुन सुषमा अंधारेंचा फडणवीसांना तिखट सवाल

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा केतकी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. आमचे देवही दारू पितात, असे म्हणत तिने नव्या वादाला तोंड फोडले आहे. आता यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

केतकीने नववर्षाच्या (Ketaki Chitale Viral Post) निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे. ग्लास हातात घेऊन केतकी सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत केतकीनं एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिनं म्हटलंय, ‘फादर त्या सगळ्यांना माफकरा. कारण त्यांना माहिती नाहीये ते काय करत आहेत. ती काही चुकीचं बोलत असेन तर मला नक्की सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकीन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००%गलत है. सगळ्यांना माफ करा पण कधी विसरू नका’.

केतकीचा दारू (Alcohol) पितानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. केतकीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. एका युझरनं म्हटलं, ‘वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं’.

या युझरला उत्तर देत केतकीनं वादग्रस्त्र विधान केलं आहे. तिनं म्हटलंय,  ‘मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसंच काही शंकाराच्या मंदिरातही. स्वत:ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते आणि सांगते. फरक शिका’.अभिनेत्री केतकीचा व्हिडीओ आणि युझरच्या कमेंटला दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे.

सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

तिच्या या वक्तव्यावरुन सुषम अंधारेंनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का? की फक्त तुमच्या विरोधी पक्षातले लोक बोलतात त्याचाच गहजब करावा त्यावरच घसा ताणून सभागृहामध्ये आक्रस्ताळेपणा करावा असं काही तुमचं ठरलं आहे?’, असा खोचक सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया येते? हे पाहावे लागेल.