अभिनेत्री स्वरा भास्करचं ‘शुभमंगल सावधान’, समाजवादी पार्टीच्या ‘या’ नेत्यासोबत घेतले सात फेरे

Mumbai: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अनेकदा तिच्या राजकीय विचारांमुळे चर्चेत असते, पण आता तिच्या आयुष्यात एका ‘राजकारण्याची एन्ट्री’ झाली आहे. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद (Fahad Ahmad) यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती. काही दिवसांपूर्वी स्वराने स्वतःचा आणि फहादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण या फोटोत दोघांचेही चेहरे नीट दिसत नव्हते. पण आता स्वराने जानेवारीत झालेल्या या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे.

स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. स्वरा भास्करने गुरुवारी (१६ फेब्रुवारी) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची आणि फहादची संपूर्ण प्रेमकथा सांगताना दिसत आहे. दोघांनी ६ जानेवारीला स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नाची नोंदणी केली होती. लग्नानंतरच्या एका फोटोमध्ये स्वरा आनंदाने रडतानाही दिसत आहे.

आपल्या प्रेमकहाणीचा व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने लिहिले की, ‘कधीकधी तुम्ही ते संपूर्ण जगात शोधता, जे तुमच्या शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री सापडली आणि नंतर आम्ही एकमेकांना शोधले. फहाद अहमद माझ्या हृदयात तुमचे मनापासून स्वागत आहे. इथे खूप गोंगाट आहे, पण तो तुमचा आहे.’

म्हणजेच जानेवारीमध्ये स्वराने आपला ‘मिस्ट्री मॅन’ बनवून जगासमोर ज्याची ओळख करून दिली, तो दुसरा कोणी नसून स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद आहे. याआधी स्वरा भास्कर आणि लेखक हिमांशू शर्मा डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, २०१९ मध्ये या दोघांच्या ब्रेकअपची चर्चाही समोर आली होती. अभिनेत्री शेवटची ‘जहां चार यार’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट १६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता.