मुंबई : सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टिझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला असून या मालिकेतली मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता शिगेला पोचली होती. यासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.
‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अश्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधून, ज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या, स्वरदा ठिगळे ह्या अभिनयसंपन्न अभिनेत्रीची निवड ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी करण्यात आली.
मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदा, अभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण असून या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून हा इतिहास सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे.
हे ही पहा: