T20 WC: नामिबियापुढे उडाली श्रीलंकेची धूळधाण, केला ५५ धावांनी लाजिरवाणा पराभव

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक २०२२ ची आजपासून सुरुवात झाली आहे. गिलाँगच्या सायमंड्स स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध नामिबिया (SLvsNAM) संघात टी२० विश्वचषकातील पहिला साखळी फेरी सामना झाला. या सामन्यात नामिबियाच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीत धडाकेबाज प्रदर्शन करत श्रीलंकेला लाजिरवाणा पराभव दाखवला आहे. नामिबियाने श्रीलंकेला ५५ धावांनी पराभूत केले आहे.

या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला. परंतु सामन्यात नामिबियाचेच नाणे खणकले. नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना जॅन फ्रिलिंकच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ७ बाद १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात नामिबियाच्या गोलंदाजांपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. श्रीलंकेचा संघ १९ षटकातच १०८ धावांवर सर्वबाद झाला आणि नामिबियाने सामना खिशात घातला.

नामिबियाच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा एकही फलंदाज साध्या ३० धावांपर्यंतचही मजल मारू शकला नाही. एकटा कर्णधार दसुन शनाकाने २९ धावा जोडल्या. भानुका राजपक्षे (२० धावा), धनंजय डी सिल्वा (१२ धावा) आणि माहिश तिक्षिणा (नाबाद ११ धावा) यांना दुहेरी धावा करता आल्या. इतर फलंदाज एकेरी धावेवरच गारद झाले. या डावात नामिबियाकडून जॅन फ्रिलिंकने शानदार गोलंदाजी केली. त्याने २ विकेट्स घेतल्या. तसेच डेविड विस, बर्नार्ड स्कोल्झ, बेन शिकोंगो (David Wyss, Bernard Scholz, Ben Shikongo) यांनीही प्रत्येकी २ विकेट्स काढत संघाच्या विजयात योगदान दिले.

तत्पूर्वी नामिबियाकडून प्रथम फलंदाजी करताना जॅन फ्रिलिंकची (Jan Freelink) बॅट चांगलीच तळपली. संघ संकटात असताना त्याने उपयुक्त अशी खेळी केली. त्याने २८ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा जोडल्या. तसेच जेजे स्मिथने नाबाद ३१ धावा फटकावल्या. जॅन फ्रिलिंकला त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.