सदा सरवणकरवर कारवाई करा ;गोळीबार करणारा दुसरा कोण हे जाहीर करा – राष्ट्रवादी

मुंबई – आमदार सदा सरवणकर हे बंदुकीचे परवानाधारक आणि त्यांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतो म्हणून क्लीनचीट मिळणार असेल तर शिंदे – फडणवीस सरकार कायदा कशापद्धतीने धाब्यावर बसवत आहे हे स्पष्ट होत आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मिरवणूकीत गोळीबार केला नाही तर दुसर्यानेच त्यांच्या बंदुकीतून गोळीबार केला म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी त्यांना क्लीनचीट दिल्याच्या अजब युक्तीला महेश तपासे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. स्वतःची अधिकृत आणि परवाना असलेली बंदुक ही दुसर्याला वापरण्यासाठी देता येते का? असा थेट सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

भारतीय शस्त्र कायदा १९५९ कलम ३ मध्ये परवाना नुतनीकरण असेल किंवा बंदुक दुरुस्ती करावयाची असेल अशावेळी दुसरा व्यक्ती परवानाधारकाचे पत्र घेऊन त्याच्या उपस्थितीतच ती बंदुक स्वतः कडे ठेवू शकतो असे स्पष्ट म्हटले आहे याची आठवणही महेश तपासे यांनी करुन दिली आहे.

दरम्यान स्वतः ची बंदुक सार्वजनिक कार्यक्रमात दुसर्याकडे देता येत नाही. दुसऱ्याकडे देऊन त्याने गोळीबार केला असेल तर त्यात आमदार सदा सरवणकर हेही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि दुसरा गोळीबार करणारा कोण हे पोलीसांनी उघड केले पाहिजे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=zodY2hafWEU