रोख सकते हो तो रोख लो! भाजपच्या चाणक्याचे पुणे महापालिकेवर लक्ष…

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ नोव्हेंबरला पुणे शहराच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविली आहे. पुणे महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची ही भेट पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे मानले जात आहे.

दरम्यान मुळीक म्हणाले, सहकार मंत्री म्हणून पदभार स्विकारल्या नंतर शाह पहिल्यांदाच पुणे भेटीवर येणार आहेत. त्यामुळे या दौर्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सकाळी शाह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. संविधान दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तयार केले जाणार असून, त्याचे भूमिपूजन शाह यांच्या हस्ते होणार आहे.

मुळीक पुढे म्हणाले, शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा दुपारी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात शाह यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी खासदार संजय काकडे, अनिल शिरोळे, प्रदीप रावत, माजी आमदार योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, बापू पठारे, दिलीप कांबळे, विजय काळे यांची उपस्थिती राहणार आहे.

मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने शहर भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची विविध व्यवस्था आणि नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्यापासून चार दिवस मंडल का बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये स्थानिक आमदार, मंडल अध्यक्ष, शहर पदाधिकारी आणि नगरसेवक मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर चार दिवसात मंडलनिहाय पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि बूथ समिती सदस्यांच्या बैठका होणार आहेत.