रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा; चाकणकरांची मागणी 

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला आहे.या हल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

रोहिणी खडसे या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना सुदैवाने कसलीही दुखापत झालेली नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर फरार झाले. हे हल्लेखोर पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे. विधानसभेत या हल्ला प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.