चार वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा तातडी घ्या – युवासेना  

पुणे – राज्यात कोरोना प्रादुर्भाव, अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा अनेक संकटांना राज्यसरकारने तोंड दिले आहे. ही सगळी आवाहने पेलवतांना राज्यातील तरुणांना मात्र बेरोजगारीचा फटका बसला आहे. अनेक तरुण नैराश्यात आहेत. पशुसंवर्धन आयुक्तालय कडून घेण्यात येणाऱ्या पदभरती परीक्षांची जाहिरात २०१७ आणि २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. पदभरती बाबत विद्यार्थ्यांना अद्याप एकही सूचना न मिळाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, ही पदभरती तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे सहचिव कल्पेश यादव यांनी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त बी.डी.रजपुत यांच्याकडे केली आहे. यादव यांनी आज त्यांची विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत पशुसंवर्धन आयुक्तालय येथे भेट घेतली. यावेळी आकाश चिमनकर, अश्विन भगत, पवन चव्हाण, सुरेश मुळीक, सुनील खरजे आदी परीक्षार्थी तरुण उपस्थित होते.

रजपूत म्हणाले, प्रलंबित ओढ भरती बाबत विभाग वित्त विभागकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणार आहे. वित्त विभागाची परवानगी मिळताच ही पदभरती तातडीने पूर्ण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. पदभरती पूर्ण होण्यासाठी पशुसंवर्धन विभाग पूर्णतः प्रयत्नशील आहे.

यादव म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने २०१७ साली प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस जवळपास चार वर्ष होत आली आहेत. याबाबत अद्याप एकही सूचना विद्यार्थ्यांना मिळालेली नाही त्यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. तसेच मेगाभारती व जिल्हापरिषद पदभरती सन २०१९ ची पदभरती ऑगस्ट २०१९ घेण्यात येणार होती पण अतिवृष्टी मुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यांनंतर पुन्हा ह्या परीक्षेचे डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात येणार होत्या पण त्या देखील परीक्षा रद्द करण्यात आल्या. नंतर कोविड-१९ च्या संकटा मुळे परीक्षा घेण्याबाबत कोणत्याही प्रकारचे प्रशासनाने विचार केलेला नाही. तीन वेळा प्रवेश पत्र येऊन ही परीक्षा घेतली गेली नाही. या मुळे पशुसंवर्धन विभागावर देखील मनुष्यबळ अपुरं असल्याने प्रचंड ताण निर्माण होत आहे.

परीक्षार्थी विद्यार्थी देखील प्रचंड तणावातून जात आहेत. एकीकडे परीक्षेची तयारी पूर्ण करून देखील परीक्षा होत नाही तर दुसरीकडे याबाबतची कुठलीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही ही बाबत चिंतेची आहे. यावर विभागाने चिंतन करायला हवे. तसेच ही पदभरती पूर्ण होण्यासाठी वित्त विभागाकडे देखील युवासेना पाठपुरावा करणार असल्याचे यादव यांनी सांगितले.