चिंचवड विधानसभा मतदारसंघात ८ इव्हिएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड

पुणे – सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

या पोटनिवडणुकीत भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीने भाजपविरोधात उमेदवार दिले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढत असून येथून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष राहुल कलाटे (Rahul Kalate) रिंगणात आहेत.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी हाती आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीच्या मतदानात ८ इव्हिएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. इव्हिएम मशीन बिघडलेल्या ठिकाणी काही काळ मतदान थांबवावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टीमने इव्हिएम मशीन बदलल्या.