तेजस्वी सूर्या यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चनांबाबत केलेले ‘ते’ वादग्रस्त विधान घेतले मागे

बंगळुरू – भारतीय जनता पक्षाचे  बंगळुरूचे वादग्रस्त खासदार आणि भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी आपले वादग्रस्त विधान बिनशर्त मागे घेतले आहे. तेजस्वी यांनी सांगितले की, माझ्या भाषणातील काही विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मी बिनशर्त विधान मागे घेत आहे.

भारतीय उपखंडातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यायला हवे, असे भाजप सूर्या यांनी त्यांच्या एका भाषणात म्हटले होते. 25 डिसेंबर रोजी आपल्या कर्नाटक राज्यात आयोजित एका कार्यक्रमात तेजस्वी असे म्हणताना दिसत आहेत  की ज्यांनी धर्म सोडला आहे त्यांना घरी परत आणणे हा हिंदूंसाठी एकमेव पर्याय आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडीओनुसार, सूर्या म्हणतात की, हिंदूंकडे एकच पर्याय उरला आहे की, ज्यांनी हिंदू धर्म सोडला आहे त्यांना घरी परत आणणे. ज्यांनी मातृधर्म सोडला आहे त्यांना परत आणावे.यासाठी त्यांनी केवळ भारतच नाही तर पाकिस्तान आणि बांगलादेशातील लोक हिंदू धर्मात परतण्याबाबत बोलले. इतकेच नाही तर तेजस्वी सूर्य पुढे म्हणाले की, मी विनंती करतो की प्रत्येक मंदिर आणि मठाने यासाठी एक लक्ष्य निश्चित केले पाहिजे.

जे हिंदू धर्मापासून वेगळे झाले आहेत, त्यांना परत आणणे आवश्यक आहे, मग ते बळजबरीने असो वा कपट, लोभ असो किंवा चोरी असो. दुसरा उपाय असूच शकत नाही. दरम्यान, त्यांचे वादग्रस्त भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये काही लोक त्यांचे कौतुक करत आहेत तर काही त्यांच्यावर टीका करत आहेत .

भाषणावरून झालेला वाद पाहून सूर्याने सोमवारी सकाळी ट्विट करून आपले विधान मागे घेतले. भाजप खासदाराने ट्विट करून लिहिले आहे की, माझ्या भाषणातील काही विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मी बिनशर्त विधान मागे घेत आहे.