श्रीनगरमध्ये पोलीस बसवर दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, १२ गंभीर जखमी!

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी या बसवर जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यानंतर यातील दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना सोमवारी सायंकाळी पांथा चौक परिसरातील आहे. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाल्याचे पोलिसांनी सुरुवातीला सांगितले होते. त्यानंतर उपचारादरम्यान दोन पोलिसांचा मृत्यू झाला. अनेक जखमी पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली जात आहे.

पोलीस दलावर हा हल्ला अतिसुरक्षा क्षेत्रात झाला. या परिसरात पोलीस आणि निमलष्करी दलांसह सुरक्षा कर्मचारी मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे सशस्त्र संकुल, ज्यामध्ये अनेक सशस्त्र पोलिस बटालियन आहेत. यात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या कर्मचाऱ्यांसाठी  कॅम्प देखील आहेत.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर खोऱ्यातील सुरक्षा दलांवर झालेला हा पहिलाच मोठा हल्ला आहे. बांदीपूरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस ठार झाल्याच्या दोन दिवसानंतर ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, हा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे.हल्ला झाल्यानंतर पोलीस दलाने या संपूर्ण परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू केली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.