‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपट युनिटच्या सदस्यांचे दहशतवादी कनेक्शन तपासले पाहिजे  – मांझी 

पटना – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका बाजूला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी ट्विट करून ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर निशाणा साधला. त्यांनी या चित्रपटाला दहशतवाद्यांचे कटकारस्थान म्हटले आहे. मांझी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की; द काश्मीर फाईल्स; हे देखील दहशतवाद्यांचे खोल षडयंत्र असू शकते, जे दाखवून दहशतवादी संघटना काश्मिरी ब्राह्मणांमध्ये भीती आणि भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत जेणेकरून काश्मिरी ब्राह्मण भीतीमुळे पुन्हा काश्मीरमध्ये जाऊ शकत नाहीत. द काश्मीर फाइल्स;  चित्रपट युनिट सदस्यांचे दहशतवादी कनेक्शन तपासले पाहिजे.

दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर प्रश्न उपस्थित केला आहे. काश्मीर फाईल्सप्रमाणे लखीमपूर फाईल्सवरही चित्रपट बनवायला हवा, असे ते म्हणाले. लखीमपूर खेरीमध्ये शेतकर्‍यांना वाहनांनी चिरडले, तर त्यावर चित्रपट का काढू नये?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.