सुषमा अंधारेंना थोबाडीत मारल्याचा दावा करणाऱ्या बीड जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीचे आदेश ?

बीड: बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. गटातटाच्या वादातून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यांनी अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला.तर महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर, या यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

आप्पासाहेब जाधव यांचा हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळला असला तरी या प्रकाराची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. या सगळ्यानंतर एका रात्रीत मातोश्रीवरुन आप्पासाहेब जाधव यांच्या हकालपट्टीचा आदेश निघाल्याचे वृत्त सूत्रांचा हवाल्याने दिले आहे.तसेच बीडच्या संपर्कप्रमुखांवरही कारवाई करण्यात आली आहे असं या वृत्तात म्हटले आहे. याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही असंही या वृत्तात म्हटले आहे.दरम्यान, हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर आता आप्पासाहेब जाधव काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.