उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाशी मिळवला हात

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (Thackeray Faction) आज (०९ नोव्हेंबर) मोठा धक्का बसला असून त्यांच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी बाळासाहेबांची शिवसेना गटात (Shinde Faction) प्रवेश केला आहे. स्वत: दिपाली सय्यद यांनी याबद्दल प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. आज सकाळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची निवासस्थानी भेट घेतली. तत्पूर्वी दिपाली सय्यद यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात असलेल्या दिपाली सय्यद या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे त्या शिंदे गटात सहभागी होतील का?, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी अगदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रयत्न करावेत, असे वक्तव्य त्यावेळी दिपाली सय्यद यांनी केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्या ठाकरे गटावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

यानंतर आता बुधवारी त्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी (Dipali Sayyed Meets Eknath Shinde) त्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले. याबद्दल माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “मी येत्या तीन दिवसात शिंदे गटात प्रवेश करत असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आले आहे. तसंच मला जी जबाबदारी दिली जाईल, ती स्वीकारण्यास तयार आहे.” आता शिंदे गटात त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली?, हे पाहाणे महत्त्वपूर्ण असेल.