मुंबई – ठाकरे सरकार हे गुन्हयांचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे, अलगाववाद्यांचे आणि अराजकता माजवणा-यांचे समर्थक असून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्यात येत आहे. त्या विरोधात भाजपा संघर्ष करेलच, जनतेनेही हा घाला परतवून लावायला हवा, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी प्रदेश कार्यकारीणीमध्ये ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीत भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी “राजकारणाचे गुन्हेगारीकरण” या विषयावर आपले विचार मांडताना ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कालखंडाचा समाचार घेत हे सरकार महाराष्ट्र धर्म आणि हिंदू विरोधी असल्याची खरमरीत टीका केली.
यावेळी आमदार शेलार म्हणाले की, ठाकरे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला. त्यानंतर आणीबाणी सारखी अघोषित परिस्थिती निर्माण केली गेली. त्यानंतर मात्र ठाकरे सरकारच्या दोन वर्षांचे वर्णन करायचे झाले तर प्रथम गुन्हयांचे समर्थन करण्यात आले तर पुढच्या टप्प्यात गुन्हेगारांचे समर्थन करण्यात आले. त्यानंतर आतंकवादाचे समर्थन करण्यात आले त्यानंतर अलगाववाद्यांचे समर्थन करण्यात आले आणि आता चौथ्या टप्प्यात ठाकरे सरकारकडून अराजकतावाद्यांचे समर्थन आणि संरक्षण करण्यात येते आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांची उदाहरणे देत आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्या या विषयाची मुद्देसुद मांडणी केली. गुन्हेगारीचे समर्थन कसे केले जात आहे हे सांगताना त्यांनी काँग्रेसच्या अमरावतीच्या मंत्र्यांनी एका पोलीस शिपायाला मारले त्यांच्यावरचा गुन्हा सिध्द झाला पण त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणी काहीही बोलत नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक आणि जवळच्यांवर छापे पडले करोडोची बेनामी मालमत्ता सापडल्याचे व केंद्रीय यंत्रणा सांगते आहे ही मालमत्ता कुठून आली याबाबत कोणी बोलत नाही. बीडच्या मंत्र्यांबाबत काय सांगावे?
अहमदनगरच्या एका मंत्र्यांच्या पीएने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली पण त्या मंत्र्यांना कोणी दोष देण्यास तयार नाही. नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्यांने संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी केली ती मुख्यमंत्र्यांनी ऐकली नाही. एका मत्र्यांने खाजगी विमान वापरल्याबाबत याचिका झाली. मंत्री दोषी आढळले त्याबाबत कोणी काही बोलत नाही. चंद्रपुरच्या एका मंत्र्यांचे दोन पासपोर्ट सापडले तर परिवहन मंत्र्यांचे म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचे उघड झाले. गृहनिर्माण मंत्र्या विषयी एका अभियंत्याने सोशल मिडियावरुन प्रतिक्रिया दिली तर त्याला मंत्र्यांच्या अंग रक्षकांनी बेदम मारहाण केली. मंत्र्यांंना अटक कधी झाली, सुटका कधी झाली कळले नाही पण सरकार काही बोलायला तयार नाही.
एक मंत्री तर १९९३च्या बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या फाशीचा विरोधक आहे तर अल्पसंख्याक मंत्री तर दाऊची बहिण हसिना पारकरचा कट्टर समर्थक असलेल्या सलिम पटेल सोबत आर्थिक व्यवहार करतात. १९९३ बाँम्ब स्फोटातील शिक्षा भोगत असलेल्या आरोपी सरदार शहावली खान सोबत आर्थिक व्यवहार करतात. मुख्यमंत्री याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत. शर्जिल उस्मानीला रेडकार्पेट घातले जाते. आझाद काश्मिरचा बोर्ड फडकवणा-या मेहक प्रभूवरील गुन्हा मागे घेतला जातो.
कायदा, फौजदारी दंड संहिता, भारतीय दंड संहिता आणि संविधान हे सर्व मोडिस काढण्याचे काम ठाकरे सरकारकडून करण्यात येत आहे. या राज्यातील तक्रारदार सुरक्षीत नाही. तपास अधिकारी, साक्षीदार सुरक्षीत नाही. तर पोलीसांना वसूलीची कामे दिली जात आहेत. ज्या रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदलीतील भ्रष्टाचार उघड केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. सीबीआयच्या प्रमुखांना मागच्या कुठल्या तरी घटनेत बोलावून घेतले जात आहे. असे भयाण चित्र महाराष्ट्रात आहे. दुसरीकडे पालघरमध्ये सांधूंना मारले जाते, गणेशोत्सव, दहिहंडी उत्सवावर बंदी आणली जाते. वारक-याला पंढरपूरात जाऊ दिले जात आहे. राम मंदिराच्या तारखेची आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली जाती. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित नाही तसाच महाराष्ट्र धर्मही सुरक्षित नाही अशा शब्दात आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला.
भाजपा महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप सैकीया, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आज दादर येथे झाली.
https://youtu.be/3AmlxDP4tcU