‘मला नवीन कपडे शिवून दिले त्याबद्दल दादा तुमचे आभार’

पुणे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बैलगाडा शर्यतीला (Bull-cart Race) विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern Marathi Movie) चित्रपटामधील “बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो”, हा डायलॉग म्हणून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच, तो नांगर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी आहे असे म्हणताच बैलगाडा मालक आणि शर्यती पाहण्यासाठी आलेल्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) चिखली येथे बैलगाडा शर्यत पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत भारतातील सर्वात मोठी असल्याचं बोललं जातं आहे. यावेळी  फडणवीस म्हणाले की, आज मोठ्या उत्साह दिसत आहे. नांगर हा जो बैलगाडा शर्यतीला विरोध करतो त्याच्या करीता आहे. बैलगाडा अखिल भारतीय संघटना, आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली.

बैल हा पळणारा प्राणी आहे तसा अहवाल सर्वोच्च न्यायालयात आम्ही सादर केला. म्हणून बैलगाडा शर्यत सुरू झाली. बैलगाडा शर्यत बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. म्हणून इथून पुढं बैलगाडा शर्यत कधीच बंद होऊ देणार नाही. असंही यावेळी फडणवीस म्हणाले. या शर्यतीसाठी लांडगे यांनी मला हा खास ड्रेस (कुर्ता, पायजमा)शिवून दिल्याचे सांगत त्यांनी पाहुण्यांना झूल घालून आणले, असे फडणवीस म्हणताच हास्याची लकेर उमटली. यावेळी फडणवीस यांनी नवीन ड्रेस शिवून दिल्याबद्दल लांडगे यांचे आभार देखील मानले.

यावेळी  नारायणपूरचे अण्णामहाराज, राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके,मावळचे माजी आमदार व माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे आ. प्रसाद लाड, समाधान आवताडे (पंढरपूर), दौंडचे आमदार राहूल कूल, पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, पुणे जिल्ह्यातील भाजप नेत्या आशा बुचके आदी यावेळी उपस्थित होते.