मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या ‘आप’च्या उमेदवाराने थेट मुख्यमंत्र्यांना धूळ चारली !

पंजाब : आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये यावेळी जनतेने ‘आप’ला पसंती दिली आहे. तर काँग्रेसची सपशेल पिछेहाट झाली आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये आपचे तब्बल ९२ उमेदवार आघाडीवर आहेत. तर यावेळी काँग्रेसला मोठा फटका बसला असून, राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने केवळ १९ जागांवर आघाडी घेतली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी रुपनगर आणि बरनाला दोन जागी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. दरम्यान, चरणजीत सिंह यांचा पराभव करणाऱ्या आपच्या उमेदवाराचं नाव लाभ सिंह उगोके असं आहे. आपचा हा विजयी उमेदवार एका मोबाईल रिपोरींग करणाऱ्या दुकानात नोकरीला असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यांची आई एका सरकारी शाळेत सफाई कर्मचारी आहे, तर वडील शेत मजूर आहेत, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. पंजाबमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर ते पंजाबमध्ये बोलेत होते.

लाभ सिंह उगोके यांनी भदौरमधून निवडणूक लढवली होती. आम आदमी पार्टीतर्फे निवडणूक लढवलेल्या आणि विजयी झालेल्या लाभ सिंह उगोके यांचं वय 35 वर्ष आहे. त्यांचं बारावीपर्यंत शिक्षण झालंय. 3 लाख 70 हजार रुपये इतकी संपत्ती असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.