राज्यातील काँग्रेस उमेदवाराची घोषणा लवकरच; केवळ राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील नेतेही इच्छुक

नवी दिल्ली : 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर जाणाऱ्या जागेसाठी काँग्रेस उमेदवाराची घोषणा सोमवारी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) येत्या सोमवारी दिल्लीत दाखल होणार आहेत. महाराष्ट्रातून शिवसेना(SHIVSENA) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु भाजप व काँग्रेसने अद्यापही पत्ते उघड केलेले नाही. काँग्रेसला एकमेव उमेदवाराची घोषणा करावयाची आहे. या उमेदवारीसाठी सुद्धा अनेकांनी फिल्डींग लावलेली आहे. यात राज्यातील तसेच राज्याबाहेरील इच्छुकांचाही समावेश आहे.

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. यापूर्वी काँग्रेस उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच . के. पाटील उद्या सकाळी दिल्लीत दाखल होणार आहेत. ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व महासचिव के. सी. वेणूगोपाल यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतरच काँग्रेस उमेदवाराचे चित्र स्पष्ट होणार आहे.