नागपूर मनपा कर्मचा-यांच्या थकीत वेतनाची रक्कम दोन टप्प्यात मिळणार

नागपूर – नागपूर महानगरपालिकेतील कर्मचा-यांच्या सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम तसेच अस्थायी ऐवजदारांचे ८४ महिन्यापासूनचे थकीत वेतन हे सरसकट दोन टप्प्यात देण्यात येईल, अशी ग्वाही देत यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. (Mr. Radhakrishnan b.) यांनी मुख्य लेखा व वित्त अधिका-यांना दिले.

मनपा कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन व इतरही मुद्दयांच्या संदर्भात नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने   मनपा प्रशासकांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत विविध विषयांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. मनपा आयुक्तांच्या कक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. विलीन खडसे, ॲड. राहुल झांबरे, संघटनेचे कार्याध्यक्ष रोशन बारमासे, सचिव लोकेश मेश्राम, उपाध्यक्ष आशिष पाटील, खिलावल लांजेवार, राहुल पांडव आदी उपस्थित होते.

बैठकीत संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम (Adv. Dharmapal Meshram) यांनी संघटनेचे विविध विषय आयुक्तांपुढे मांडले. अनेक वर्षापासूनच्या कर्मचा-यांच्या थकबाकीला आयुक्तांनी सकारात्मकरित्या प्रतिसाद देत ही रक्कम दोन टप्प्यात कर्मचा-यांना देण्याचे निर्देश मुख्य लेखा व वित्त अधिका-यांना दिले. याशिवाय लाड पागे समितीच्या शिफारशी मनपातील अधिसंख्य पदावर कार्यरत कर्मचा-यांना लागू करण्याची मागणी यावेळी ॲड. मेश्राम यांनी केली. लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाद्वारे परिपत्रक जारी करण्यात आले असून यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेउन शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही आश्वासन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले.यावेळी माजी नगरसेवक मनोज सांगोळे हे देखील उपस्थित होते.