‘बांबू’त लागणार प्रेमाचे बदामी बाण

आपल्याला प्रेम कधी, कुठे, कसं होईल सांगता येत नाही. पण प्रेम पडल्यावर कधी ना कधी ‘बांबू’ हे लागतातच. आपल्या आजुबाजुला असे अनेक जण आहेत, ज्यांचे आयुष्यात एकदा तरी ‘बांबू’ लागले आहेत. तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा आणि मोठ्यांना पुन्हा जुन्या आठवणीत घेऊन जाणारा ‘बांबू’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नुकतेच ‘बांबू’ चित्रपटातील ‘प्रेमाचा बाण बदामी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. समीर सप्तीसकर यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला अभिषेक खणकर यांनी शब्धबद्ध केले असून अवधूत गुप्ते यांचा सुमधुर आवाज लाभला आहे. प्रेमाचा बाण जेव्हा थेट हृदयाला लागतो तेव्हा मनात फुलपाखरं उडायला लागतात. मग त्यात नजर चोरून हळूच त्या व्यक्तीला बघणे असो किंवा त्या व्यतीच्या विचारात हळूच गालावर हसू उमटणं असो. असेच काहीसे आपल्याला या गाण्यात अभिनय आणि वैष्णवीमध्ये पाहायला मिळत आहे. सोबतच या गाण्यात आपल्याला तेजस्विनीची एक झलकसुद्धा पाहायला मिळत आहे, त्यामुळे अभिनय आता हे गाणे कोणासाठी म्हणतोय, हे ‘बांबू’ पाहिल्यावरच कळेल.

गायक अवधूत गुप्ते म्हणतात, मला खूप कमी रोमॅंटिक गाणी गायला मिळाली आहेत. हे गाणं गाण्यासाठी मी फार उत्सुक होतो. विशालसोबत या आधीसुद्धा काम केले आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ हे गाणं श्रवणीय आहे. काही गाणी अशी आहेत जी मी रेकॉर्ड केल्यानांतर लूपमध्ये ऐकत असतो, त्यातलच हे सुद्धा एक गाणं आहे. गाण्याचं संगीत आणि बोल हे सुद्धा अफलातून आहेत.

गाण्याबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, चित्रपटाच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळेपण आहे. तसंच या गाण्यातदेखील आहे. हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रेमाची आठवण होईल. त्यात अवधूतच्या आवाजाने या गाण्याला अजूनच चारचांद लावले आहेत.”

अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यासोबतच आपल्याला शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदमही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. ‘बांबू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून लेखन अंबर हडप यांनी केले आहे.