पवारसाहेबांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग आहे; त्यांच्या सुरक्षेत वाढ करा – राष्ट्रवादी

मुंबई – पवारसाहेबांवर हल्ला करुन राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होता का? पवारसाहेबांच्या (Sharad Pawar) घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान आमच्या बलस्थानावर झालेल्या हल्ल्याची राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. हा हल्ला राजकीय प्रेरीत असेल तर आणि राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न असेल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशाराही महेश तपासे यांनी यावेळी दिला.

पवारसाहेब यांच्या निवासस्थानी जो भ्याड हल्ला झाला. त्यामध्ये आरोपींना अटक झाली आहे परंतु पवारसाहेबांच्या घरावर हल्ला करुन राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय हा खरा प्रश्न आहे असेही महेश तपासे म्हणाले.

पवारसाहेबांनी कालच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत कसे संबंध आहेत हेही सांगितले आहे. मात्र आज एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करत आहे त्यांनीच विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला.

आपल्यावर कुणी दगड भिरकावला तरी महात्मा गांधी यांच्या शिकवणीप्रमाणे सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते त्याप्रमाणे आज राज्यभर व गोव्यातही महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या पट्टया बांधून कालच्या घटनेचा निषेध केला आहे.

एकंदरीत राज्याचे वातावरण अस्थिर करण्यासाठी केलेला हा हल्ला होता. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे स्वागत केले. पेढे वाटून आनंद व्यक्त केला. न्यायालयाचे स्वागतही केले त्यामुळे ते दगड उचलतील का? असा सवालही महेश तपासे यांनी केला.

पवारसाहेबांचा आजचा सातारा दौरा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रद्द केला आहे. मात्र उद्या पवारसाहेब नागपूर दौर्‍यावर आहेत अशी माहितीही महेश तपासे यांनी दिली. भाजपचे अनिल बोंडे हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. जनतेला भडकावणे हे काम अनिल बोंडे सातत्याने करत आले आहेत. कालच त्यांनी या घटनेवर भाष्य केले होते. त्यामुळे कालच्या घटनेची पूर्व कल्पना अनिल बोंडे यांना होती का? हिंसक हल्ल्याला त्यांचा पाठिंबा होता का? हेही तपासले पाहिजे असा सवाल करतानाच याचीही चौकशी व्हावी अशी मागणी महेश तपासे यांनी केली.

राज्यात राजकीय क्लेश निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र गृहमंत्रालय यावर लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र सुरक्षित रहावा. भडकावू भाषण कोण करत असेल तर असं करुन महाराष्ट्र अस्थिर करु नका अशी हात जोडून विनंती महेश तपासे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात विलिनीकरणाचा कोणताही मुद्दा नव्हता तर एसटीचे आधुनिकीकरण करु असे म्हटले आहे. पडळकरांना मराठी नीट वाचता येत नाही त्यांना मराठीतील जाहीरनामा वाचण्यासाठी पाठवून देऊ असेही महेश तपासे म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते महेश चव्हाण आणि ओबीसी सेलचे उपाध्यक्ष राज राजापूरकर उपस्थित होते.