दिवाळखोर सिलिकॉन व्हॅली बँकेला अमेरिकेच्या सरकारकडून कोणतीही मदत मिळणार नाही

नवी दिल्ली(New Delhi) – सिलिकॉन व्हॅली बँकेच्या (Silicon Valley Bank)ठेवीदारांनी आपापल्या ठेवी काढून घेण्यासाठी बँकेत गर्दी केल्यानंतर कॅलिफोर्नियाच्या(California) नियामकांनी या बँकेला टाळं ठोकलं आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळखोर सिलिकॉन व्हॅली बँकेला अमेरिकेच्या सरकारकडून कोणतीही मदत मिळणार नाही, असं अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन (Treasury Secretary Janet Yellen) यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. आर्थिक मंदीदरम्यान अनेक गुंतवणूकदार आणि मोठ्या बँकांना सरकारनं मदतीचा हात देण्यात आला आहे, मात्र सरकार हे पाऊल पुन्हा उचलणार नाही, असं त्या म्हणाल्या.

या बँकेतल्या ठेवीदारांबद्दल सरकारला काळजी आहे आणि त्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष आहे, असंही त्यांनी सांगितलं. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीमुळे 2008 च्या आर्थिक मंदीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ही घटना त्यासारखी नसल्याचं सांगत येलेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना दिलासा दिला. अमेरिकेची बँकिंग यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित, उत्तम भांडवली पुरवठा असलेली आणि लवचिक असल्याचंही त्या म्हणाल्या.