शरद पवारांना 2024 ला सर्वात मोठी भेट द्यायची आहे – जयंत पाटील

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा काल मावळमध्ये पोहोचली. त्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आवाहन सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. 2024 ला शरद पवार यांना मोठी भेट द्यायची आहे, असं सांगताना राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आणायचे आहेत आणि ते काम तुम्ही आम्ही करायचं आहे असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या पक्षात काम करत आहोत. एकदा आम्ही महाराष्ट्रात 72 आमदारांच्या संख्येवर पोहोचलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाकडे आली. एकत्रित काम करायचं म्हणून आम्ही ती संधी सोडली. महाराष्ट्रात 2024 ला निवडणुकांमध्ये सर्व जागा निवडून आणण्याची जिद्द तुमच्यात हवी.

शरद पवार यांनी उभं आयुष्य वेचलं. आजही ते 24 तास काम करतात. त्या शरद पवार साहेबांना 2024 साली सर्वात मोठी भेट द्यायची आहे. 2024 ला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष करायचा आहे, राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आणायचे आहेत आणि ते काम तुम्ही आम्ही करायचं आहे असं पाटील म्हणाले.