दंगल घडविण्याच्या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी करावी भाजपा

पुणे – त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

मागील आठवड्यात त्रिपुरामध्ये जाळपोळ झाली असा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून नांदेड, मालेगाव, अमरावती येथे हिंसक घटना घडल्या. या घटनांना प्रतिकार करण्यासाठी बाहेर पडलेल्या सामान्य नागरिकांवर हल्ले झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज शहर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांचे निवेदन जगदिश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. त्या नंतर मुळीक बोलत होते. सरचिटणीस राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदिप लोणकर यांचा आंदोलनात प्रमुख सहभाग होता.

मुळीक पुढे म्हणाले, ‘ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक करावी, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी, भाजपच्या कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाया थांबवाव्यात, त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत ह्या आमच्या मागण्या आहेत.’