मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यायला हवा; चंद्रकांतदादांची मागणी

मुंबई : मुख्यमंत्र्यांना इतर दोन पक्षांवर विश्वास नसेल तर त्यांनी आपल्या मुलाकडे चार्ज द्यावा, तब्येतीबाबत निष्काळजी राहू नये, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलीये. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहावं. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यायला हवी. त्यांची तब्येत ठीक नाही, असं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मागील 2 वर्षांपासून सर्व सिस्टम कोलॅप्स झाल्या आहेत. सरकारचा अधिकाऱ्यांवर धाक राहिलेला नाही. त्यामुळे माहिती समोर येतेय की अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी रडारवर आहेत. यामध्ये तथ्य असू शकतं, असं पाटील म्हणाले.

पाटील यांनी म्हटलं की, राज्याचे पोलीस सक्षम किती आहेत हे दिसलं आहे. लोकशाहीमध्ये आम्हाला काही मागणी करण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले. संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदींचं मुखदर्शन झालं नसलं तरी ते सर्व ठिकाणी कार्यशील आहेत. ते उपलब्ध नाहीत असं नाही. मुख्यमंत्र्यांनी किमान आदित्य ठाकरे यांना तरी चार्ज द्यावा परंतु त्यांच्यावर देखील मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही का? असा टोलाही त्यांनी लगावला.