काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही; चव्हाणांचा पलटवार

मुंबई – भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत. यूपीए आता अस्तित्वात राहिली नाही, काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी निर्माण करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ममता यांचे हे वक्तव्य कॉंग्रेस नेत्यांना आता चांगलेच झोंबले आहे असे दिसत आहे. ममता बँनर्जींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा खा. सोनियाजी गांधी आणि खा. राहुलजी गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल.

मागील ७ वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही असं चव्हाण यांनी म्हटले आहे.